Friday, 6 January 2012

संध्याकाळ !!


ती एक  रोजच्या सारखीच संध्याकाळ होती ...
म्हणजे तसं रोज हा शब्द उगाच समाधाना साठी ... वेळेचं भान ठेवण्याचं काही काही कारण तसं नव्हतंच आजकाल ..

तेवढ्यात एक ओळखी मधील आवाज कानावर पडला ...
काही आवाज आपण विसरत नाही ... त्यातलाच हा एक ..
मान  सर्रकन वळली ...
कधी कधी सब-कॉन्शस लेवल वरची अशी सवय ,….” का ?”  असा प्रश निर्माण करते ...

तर .... मान वळली ... पाहिलं तर समोर ती ...

तीच बट ... फक्त आता त्यावर वयाच्या खुणा होत्या ...
कधीतरी  तीच बट चेहरया वर लाडिक पणे खेळत असायची .... आता ती बागेत हिरमुसून बसलेल्या एखाद्या लहान मुलासारखी रुसलेली वाटली !!

हास्य ही तेच होते ...म्हणजे ती ते तसं दाखवत होती ... पण ... त्यात नव्हता तो जिवंत पणा ..  !!
प्रभात कालीचा लालीमा आणि कातर वेळेची लाली ... यातल्या फरकाची ती अचूक जाणीव होती ...तो जाणवावा इतपत प्रेम नक्कीच केलं होत मी तिच्यावर !!
तितक्यात नकळत तिच्या डोळ्यांकडे लक्ष गेलं ... जे बट आणि हास्याच्या बाबतीत तेच इथेही बोचलं कुठेतरी ...
ज्या डोळ्यांमध्ये "का?" हे विचारतांना एका लहान मुलाची निरागसता वास  करायची ... त्याच निरागसपणावर आता करुणेचं,कोरडेपणाचं.. मिश्रित क्रूर अधिराज्य होतं
करुण आणि क्रूर या दोन परस्पर विपरीत भावना अशा एकत्र नांदतील हे कधी स्वप्नात ही वाटलं नव्हतं !!

मग नजर उगाच भिरभिरत राहिली .... पदर ... गोरी मान .. नाजूक मनगट ... सडसडीत बोटं ... सगळ आठवत होतं ... पण नातं वजा जाऊन बाकी फक्त भयाण शांतता विरून राहिली होती हवेत !! 

त्या शांतते मुळेच की काय पण पदराने वार्याशी अघोषित अबोला केला होतां ...
गोरी मान ... लाडिक पणे वेळावत नव्हती ... लाडिक पणाची जागा ... एका ताठ्याने घेतली होती ...
मनगटं एखाद्या विधवा स्त्री सारखी ... बोडकी होती ... बांगड्यांची किणकिण तिथे नव्हती  .. तिथे होतां काळ ... गेलेला ....घड्याळ्याच्या रुपातस्थितप्रज्ञपणे चालत राहणारा  !!
सडसडीत बोटं हवेतल्या हवेत काहीतरी चाळवतायत असा उगीच भास झाला ... ती माझा स्पर्श शोधत असतील का ? असतील ही कदाचित ... किंवा नसतील ही .. असण्या नसण्याने आता काय फरक पडत होतां म्हणा ?

त्या केसांना अजूनही शिकेकाई चा वास असेल का ? अजूनही नाजूक तळवे उन्हात पोळत असतील का ? का या रखरखत्या एकटेपणात ते होरपळले असतील आणि सराईत झाले असतील ?

वाटत होतं आपण आता पुन्हा प्रेमात पडणार ... पण एका मनाने दुसर्या मनाला लगेच सावध केलं ... त्याचं मी पण ऐकलं ... खरय ... मनात काहिली होती ... लहान मुली सारखी अल्लड अशी ती माझी होती ? का एका क्षणात सगळं लाथाडून..फक्त भौतिक सुखासाठी मनाची दारं बंद करणारी ती माझी होती ?

प्रश्न प्रश्न प्रश्न ... व. पुं. आठवले ... "अपेक्षा ठेवल्या नाहीत की दुखांच ओझं वाहायची वेळ येत नाही ... व पु तिने वाचले नसतील ?

तितक्यात तंद्री भंगली ... मी जरा दचकूनच भानावर आलो .हाक कानावर पडली .... कानावर विश्वास नव्हता  .... मला बोलवत होती ती ? हो.. नाव तर  माझंच होतं... ठोके वाढले होते ... लाखो विचार क्षणात डोकावून गेले ... सर्रकन काटा अंगावर ...
परत सुखी संसाराची चित्र ... परत तो सुख पटलाचा अनुभव ...
बहिणाबाई दळण दळता दळता गात होत्या ...

मन वढाय वढाय ... उभ्या पिकातलं ढोर ... किती हाकला हाकला ... फिरू येतं पिकावर!!
बहिणाबाई तरी वाचल्या असतील तिने ?

कानात अजूनही आवाज घुमत होतां .. माझं नाव ... लाडाने घेतलेलं ... माझे पाय हलले .. मनाने निश्चय केला .. काय बोलायचं ते ठरलं .. सगळ क्षणार्धात ...

तितक्यात .... एक गोड मुलगा धावत येऊन तिला बिलगला ... तो मीच होतो .... ४० वर्षं आधीचा ... माझंच नाव ?? आधी वाटलं भास आहे ... पण नाही भास नव्हता !!
आनंद वाटला ... पण बोचरी जाणीव सोबतीला आनंदाचं बोट धरून आली ... माझंच नाव मुलाला ? निर्णय....निर्णयावर केलेलं शिक्कामोर्तब...उत्तर...माझं नाव ... मुलगा...आठवण...!!

त्याने नकळत माझ्याकडे कटाक्ष टाकला ... आणि हसला ... गोड .. ते त्याने आईचं घेतलं होतं ...

दुरून जी नयन रम्य सुखाची लाट वाटत होती ... ती सुनामी होती ... १ क्षण .. सगळं साफ ... ती संध्याकाळ वेगळी होती !!

मी खिडकी मधून बाहेर बघायला लागलो ... रूळांचा आवाज आणि डब्याची खडखड मोजायला लागलो ... गालावर उष्णपणाची जाणीव होत होती ... मी ती होऊ दिली !!

अजूनही मी असाच मन रमवतो ... कधीतरी "तो" दिसतो डब्यात ... मोठा आहे आता .. त्याच्या वाढदिवसाला मी त्याला  wish केलं ...
त्याच्या डोळ्यात प्रश्न दिसला ... "तुम्हाला कसं ??? .... " .. मी त्याच्या आय-कार्ड कडे बोट दाखवत म्हंटल  माझ्या मुलाचं नाव पण हेच आहे ... पण तो आता माझ्याजवळ नाही .. म्हणून तूला ... !!

तो उत्तरा दाखल हसला ... तिच्याच सारखं ... निरागस .. गोड ...तो म्हणाला मी सांगेन आईला ... मी म्हणालो "सुखी रहा" मनातल्या मनात म्हणालो "......दोघंही " !!!

अजूनही आम्ही तिघं भेटतो अधून मधून .. मी ... प्रश्न आणि वेगळी असूनही माझ्या आठवणीत आता रोजचीच झालेली ती .... संध्याकाळ !!

4 comments:

Janpune said...

इतके निर्धावालोयात्त आपण आताशा कि असं मनाला काहिच बोचत नाही .
मन बाधिर होणं , ह्याचा अर्थच आताशा कळत नाही .
झटकून टाकावी बसलेली धूळ ,
तितक्या सहजतेने कुठल्याही वेदना फुंकरून टाकतोय आता आपण , अगदी स्वताच्यांही !

कधीतरी क्वचित मग , असं काहीसं वाचून , हलवून जातो मनातून मुळापासून
इतकं सुंदर कि ज्याला सुंदर म्हणतानाही स्वर गहिरा होतो

अप्रतिम केदार !!!

mandar said...

कड़क फारच भारी आहे रे

Vrushali said...

"अपेक्षा ठेवल्या नाहीत की दुखांच ओझं वाहायची वेळ येत नाही"...असं व.पु. म्हणतात.. पण अपेक्षा आपल्या माणसांकडून नाही तर कोणाकडून करायच्या...????

Shabd गौरव said...

mitra, hya kavitanna chan mhanaycha, manat nusti kajali pasarleli astana ?? amurt gahirya ani gadad andharya ashya anubhavane vedhun taklela astana ??.. hya lekhanshailila daad dyaychi ?? ki anvayarth lavayche darweles wegwegle ?? kahihi pratisad dena kinva faar chan asa mhanana he faar murkhpanacha aahe.. bass fakt anubhavaychi hurhur, jokhat rahaycha vidarak vastav ki kalpanecha khel...