Sunday, 9 April 2017

ग़म-ए-दौरां का यार..


मी देव देव - कर्मकांड मानत नाही. पण प्रत्येक कार्यात , प्रत्येक संकटात सदगुरू कायम सोबत करतात , बळ देतात ही ठाम श्रद्धा आहे माझी. 

कायम "ती एक शक्ती" मला सोबत करते याच्यावर माझा नितांत विश्वास आहे ...
खरं तर या रचनेतील पाहिलं कडवं मला २-३ वर्षापूर्वी सुचलं होतं. पण त्या नंतर काही सुचेना. अन काल अचानक दुष्यंत कुमार यांची " तू किसी रेल सी गुजरती है ... " ही रचना वाचत असताना , पुढील ३ कडवी एकामागे एक सुचत गेली. 

=========


ग़म-ए-दौरां का यार तू है ,
आबशारों के अशआर तू है ,

कश्मकश की बहती नदी में ,
टूटी कश्ती का पार तू है !!

रातो के घुप्प अंधेरो मे ,
राह दिखाए वो मशाल तू है ,
जिंदगी से लडता हुं जब मै,

मेरी तकलीफ़ों पर यलगार तू है !!

मेरी किश्ती है अदनीसी ,
उसे संभाले वो पतवार तू है ,

इक छोटासा पंछी हु मै ,
मेरी खुशियो का अंबार तू है !!


मै हूँ इक छोटा झरना ,
मिलूं जिसमे वो मझधार तू है ,
मेरी हर इक सांस मे बसा ,
तुझसे प्यार का इजहार तू है !!


=============================

ग़म-ए-दौरां - दुःखाची वाट
आबशारों - झरा / धबधबा
अशआर - शेर
कश्मकश - द्विधा / ओढाताण
घुप्प - मिट्ट,
यलगार - हल्ला
अदनीसी  - छोटीशी / फुटकळ
पतवार - वल्हं
अंबार - साठा
मझधार - मोठा प्रवाह
 इजहार - होकार / रुकार 



केदार दत्तात्रेय गोगटे
०९/०४/२०१७

Tuesday, 28 April 2015

कृष्णाय स्व: , कृष्णाय इदं न मम !!

मध्यंतरी पौरोहित्या संबंधी एक पोस्ट वाचनात आली , त्यावेळेस वेळे अभावी आणि कमी शब्दात कमेंट करणे शक्य नसल्याने हा लेखन-प्रपंच करतोय . वाद-विवाद , स्पष्टीकरणे , आरोपां-आरोपी या सगळ्यांची मुळीच ईच्छा नाही . मला नाही , तुम्हीही फंदात पडू नका . मात्र या दृष्टीने सकारात्मक चर्चा जरूर घडावी. आणि माझ्या मतात काही चूक असेल तर ती जरूर सांगा.( ती मी मान्य करेन"च" अशी अपेक्षा मात्र ठेवली नाहीत तरी चालेल)
====================

         काही लोकांच म्हणण होतं की पुरोहित/ब्राम्हणांनी या "पौरोहित्य" प्रकाराचा बिझनेस केलाय . मला असं वाटतं की त्याला काही हरकत नसावी. कारण कोणी काय करावं हे सांगायला आपण कोणीही नाही. आणि पैसा हे सर्वस्व नसलं तरी काळाची गरज आहे . आपणं सगळेही हेच करतो , मग फक्त या एका प्रोफेशन कडूनच "निष्काम-कर्मयोगा"ची अपेक्षा करणं तितकंस संयुक्तिक नाही.

पण मग जेव्हा तुम्ही बिझनेस करता , तेव्हा २ गोष्टी फार महत्वाच्या आहेत
१) How you do it ?
2) How you deliver the deliverables ?

पुरोहित , भटजी वगैरेंवर माझा राग याच करता आहे.(पुरोहीतांवर आहे , पौरोहीत्यावर नाही) रागाची काही निवडक कारणे खालील प्रमाणे :

1.      पूजा सांगताना तोंडात पान तंबाखू पुडी इत्यादी ठेवून पूजा सांगणे
2.      पूजा ही यथासांग आणि प्रेझेन्टेबल हवी , अक्ख शिवरुद्र "१.५" मिनटात म्हणतो म्हणून फुशारकी मिरवणारे "तथाकथित" भटजी पाहिले की डोकं फिरतं . (श्रीरुद्रांस सुद्धा हे बेणं काय म्हणतंय हे कळतं की नाही हा संशोधनाचाच विषय होईल.
3.      एकदा दक्षिणा जर ठरली आहे , तरी साहित्य दाना वर डोळा ठेवणे . ( हा अनुभव स्वत: घेतलाय . ते महाशय आहेराची पाकीट मी घेणार म्हणून हुज्जत घालत होते .
4.      अव्वाच्या सव्वा पैसे उकळणे - स्वानुभव :
ग्रह मंत्राभिषेक (अंगठी घालण्यासाठी ) - ११०१ रुपये
वर्ष-श्राद्ध - ५०००
सत्यनारायण - ५५१ ईत्याद .
5.      वेळ न पाळणे . (कॉमन दोष)
6.      प्रत्येक यजमानाचे वेगळे पैसे घेऊन  सुद्धा "सामुहिक" पूजा उरकून "टाकणे" !!
7.      पूजा चालू असताना पेपर वाचन , मोबाईल वर गेम कॉल फोटो ईत्यादी पाहणे .
8.      आपण पौरोहित्य करतो त्यामुळे अवांछित ठिकाणी आपण न दिसलेले बरे , इतके साधे लॉजिक सुद्धा न कळणे . करायचंच आहे ते घरी करावं , तिथे तुम्ही तुमचे राजे , तिथे कोणी तुम्हाला न पाहू शकतं ना काही बोलू शकतं.

तूर्तास इतके पुरे ... यादी मोठी आहे ...

सध्या अपेक्षित असलेल्या गोष्टी :
1.      प्रोफेशन म्हणवता ना पौरोहीत्याला ?? मग प्रोफेशनल राहणं "गरजेचंच" आहे .
2.      पैश्याच्या बाबतीत पण प्रोफेशनलीजम पाहिजे"च"
3.      "What you see , is what you Get !!" - शब्दाला, आचाराला, प्रेझेन्टेशनला पर्याय नाही!!

नुसतं मी "ब्राम्हण" आहे म्हणून "मला पहा अन फुलं वाहा !! " हे दिवस गेले आता ...
लोकांकडे दान धर्म यासाठी पर्याय भरपूर झाले आहेत त्यामुळे हे तथाकथित "प्रोफेशन" जर टिकवायचे असेल तर "प्रोफेशनल Glamour " ला पर्याय नाही .


मध्ये मी एकदा "ज्ञान-प्रबोधिनी" च्या पुरोहितांनी सांगितलेली पूजा पहिली ऐकली अनुभवली , काय ते सुंदर उच्चार , प्रोफेशनलीझ्म , अर्थासहित पूजा समजावून सांगण्याची पद्धत , उगा फाफट पसारा नाही. सगळं कसं मुद्देसूद.  हे सगळं पाहिलं की हे पैसे "वाया गेले" असं मुळीच वाटलं नाही !!

मला माहीत आहे के हे सगळं वाचल्यावर काही "धर्म-मार्तंड" "धर्म-रक्षक" बाह्या सारून या सगळ्यांची स्पष्टीकरण द्यायला येतील. त्यांना ईतकेच सांगेन , की "Let your Work and Professionalism Talk about what you do !!". कारण तुम्ही काही पूजा पौरोहित्य करून "समाजसेवा" करत नाही आहात , काम करताय त्याचे पैसेही वाजवून घेत आहात . यामुळे "धर्म-रक्षण" "ब्राम्हण(पौरोहित्य करणारे) गरीब असतात , त्या बाबतीतच काटकसर सुचते का ?" वगैरे चे डोस इकडे देऊ नका !!

या शिवाय हे ही इकडे लक्षात घ्यायला हवे की "पौरोहित्य" हे फक्त सिम्बोलिक प्रोफेशन आहे. कोणत्याही प्रोफेशन ला , मग ती वकिली असो , लेखा परीक्षण असो वा हॉटेल असो , वरील तत्वे लागू होणारच.


- केडी . २९ एप्रिल २०१५ .

गुड डील !! ...आय शल मेक यु एन ऑफर यु कांट एक्सेप्ट !!

आजकाल गम्मत अशीये की जोडीदार निवडताना आपण (मुलेही आणि मुलीही) जोडीदार किंवा चांगला माणूस असं नाही , पण एक चांगलं "डील" शोधतोय !!

हे एक नागवं-नागडं सत्य आहे . आपण ते स्वीकारत नाही हा भाग अलाहिदा !! पण न स्वीकारल्या ने सत्य बदलत नाही .

मग स्वानुभव असा आहे कि ,
चांगली इन्कम
चांगलं शिक्षण (पदव्युत्तर शिक्षण , सीए , आणि आणखी २ पदविका )
स्वत:च घर (मी माझ्या वडलांच्या घराला माझंच घर मानतो )
स्वत:च बिजनेस
दिसायला अगदी बाजीराव नसलो तरी टाकाऊ नक्कीच नाही ...
३०व्या वर्षी १२ लाखाची चारचाकी आहे , ती मात्र स्वत:ची आहे ...
हे सग्गळ असून ही
आता एक नवीनच अट आड येतेय ....

शहर ...
पुण्याचे"च" स्थळ हवे ...
"मुंबईचे"च" स्थळ हवे ...
"कॉस्मो-मेट्रो" चे च स्थळ हवे ....

आता "काही" शहरं म्हणजेच शहरं , बाकी म्हणजे खेडी असा सूर वारंवार यातून ऐकू येतोय.
अन आणखी विचित्र म्हणजे या अटी टाकणारी पोटेन्शियल गिर्हाईकं त्या शहरात राह्णारीच असतील असंही नाहीये. म्हणजे अगदी बोकुड-जळगाव च्या मुलीला सुद्धा पुण्यातला"च" मुलगा हवाय !!
आता मला हे कळत नाही की जर लग्नानंतर हे "स्थळ" जर छोट्या खेड्यात शिफ्ट झाले तर आपण त्यांना "घटस्फोट" देणार का ??शिवाय हे ही उघड आहे की आमच्या सारख्या शहरात ब्राम्हण घरांची संख्या तशी फार कमी आहे.

तर मग आता या लग्नाच्या बाजारात आपण स्वत:ला विकायला ठेवायचं ठरवलन तरी विकत घ्यायला कोणी मिळत नाही !! कारण यांना "कृ.उ.बा." पेक्षा "मॉल" मधला माल जास्त "ग्ल्यामरस" अन "क्लिक" होणारा वाटतो !!
म्हणून वाटतं ... "डील" शोधण्यापेक्षा "माणूस" शोधा , सग्गळ बदलू शकेल .. बदलतं. पण जनरली माणसं बदलत नाही ...!!
"डील" शोधण्यापेक्षा "माणूस" शोधा ....

टीप :
(मी मेल/जंटलमन/पुरूष असल्याने हा लेख माझ्या नजरेतून लिहीला असला तरी हा काही फक्त स्त्रीयाच कश्या चुजी किंवा बापेच कसे चुजी हे दाखवायसाठी लिहिलेला नाही , उगाच इकडे कमेंट्स मध्ये "स्त्री-पुरुष समानता" "पुरोगामी" वगैरे भारी शब्दांच्या रांगोळ्या घालत बसू नका, इकडे शब्दांचा पाऊस फार पडतो , रांगोळ्या पुसल्या जातील अन त्या तसल्या कमेंट्स मध्ये मला तरी काही विन्टरेष्ट नाही !! ... थोडक्यात काय ?? मुद्द्याचं बोला )

Tuesday, 13 January 2015

मन पाखराचे पंख

मन पाखराचे पंख,
मन आकाशात गुंग,
मन अळीवाच्या पानावर,
इवलासा थेंब

मन उभे हाकेवरी,
मन खूप खोल दरी,
मन आठवांच्या सरीमध्ये,
भिजलेले चिंब

मन निर्गुणाची वारी,
मन सगुणाची टाळी,
मन पांडुरंग माईमध्ये,
होई गुंग गुंग

मन प्राजक्ताचा वास,
मन कस्तुरीचा भास,
मन कमळाच्या प्रेमामध्ये,
होई एक भृंग

मन सागराची लाट ,
मन धुक्यातली वाट ,
मन स्वप्नातल्या गावामध्ये,
रेंगाळते दंग

मन ओंकाराचा नाद,
मन मनाशी संवाद,
मन सावळ्याच्या रंगामध्ये,
होई एकरंग .....
होई एकरंग ....

केदार १४/०१/२०१५ दु १२:४० 

Wednesday, 22 October 2014

“ मी नै जा “ फटाका. -- सौजन्य : U-T फायरवर्क्स मुंबई !!

        या दिवाळीत मार्केट मध्ये एक नवीन फटाका बाजारात आलाय. फटाक्याच नाव काय ? तर “मी नै जा-फटाका”.
सदर फटाका एका मस्त प्याकिंग मध्ये येतो . यात वरवर पहाता २ सुरानळ्या एकमेकाना बांधल्यासारख्या दिसतात . अन कोणीही जो हा फटाका पाहतो त्याला फारच म्हणजे “फारच बुवा” आशावादी वगैरे वाटायला लागत . त्यामुळे बरेच लोक तो विकत घेण्यापासून स्वताला रोखू शकत नाहीत .

         आता फटाक्या बद्दल बोलू . हा फटाका पाहिल्यावर तर कानठळ्या फोडणारा असेल अस वाटत. पण खरी गम्मत याला पेटवल्यावर येते. हा फटाका पेटवला रे पेटवला ... की लगेच यातला एक मोठा चिरका फटाका “मीमु -मीमु -मीमु-मीमु ” असा आवाज करत वेगळा उडून जातो .... याच्या मागे हजारोनी बारीक बारीक चीरके फटाके “महामु-महामु-महामु-महामु” असा आवाज करत करत मागे-मागे उडतात. मग मागे उरलेला फटाका थोडा शांत बसतो अन मग अचानक प्रचंड वेगाने या टोका पासून त्या टोका पर्यंत फिरायला लागतो अन तो फिरत असताना तो पुढे गेला की नंतर २ सेकंदानी “मोनमोनमोनमोन” असा आवाज येतो , अन तो ऐकायला छान पण वाटतो . मग ही अशी फाटाफूट झाली कि दोन्ही फटाके लय जोरा जोरात आवाज करत ४-५ मिनिटे कार्यक्रम करतात .. अन मग बरोब्बर “१९ व्या मिनिटाला “ धडाम करून आवाज ऐकू येतो , तेव्हा “मोनमोनमोन” करणारा फटाका नेत्रदीपक रोशनाई करून दाखवतो , पण खरी मजा तर “मीमु -मीमु -मीमु-मीमु ”” वाल्या फटाक्याची येते .. हा फटाका अलमोस्ट विझायला आलेला असताना “मी-नै-मी-नै-मी-नै” असा आवाज करायला लागतो , काही लोकाना हा आवाज “म्याऊ-म्याऊ-म्याऊ-म्याऊ”असा पण ऐकू येतो. (“मीमु -मीमु” फटाक्याच्या कव्हरवर मात्र वाघ का असतो मला पण माहित नाही). अन जस्सा हा “मीमु” फटाका संपायला येतो , ते चीरके “महामु-महामु” करणारे फटाके अचानक दिसेनासे होतात अन खुश्कीच्या मार्गात घुसून विझून जातात !!

        काही लोकाना शेवटपर्यंत वाटत राहत की “मोन्मोन्मोन” आणि “मीमु -मीमु” फटाका काहीतरी चमत्कार घडवेल , पण दोन्हीही अपेक्षाभंगच करतात , अन या सगळ्यात अचानक खोक्यातून एक मोठ्ठा फटाका बाहेर पडतो , हा अचानक कुठून येतो हे कोणालाच कळलं नाहीये , पण तो एकदम सुस्साट वेगाने खोक्यातून आकाशात उडतो , द्धाडकन “मीsssssssssम-मीsssssम-मीsssssम आवाज करत मोठ्ठी हिरव्या रंगाची रोशनाई करतो आणि विकत घेणारा माणूस बोट घालून हे बघत बसतो , तोंडात !!

तर असा हा फटाका सग्गळ्यानी पाहिलाच असेल अशी अपेक्षा , पुढच्या वेळेस घ्यायच्या आधी खूप विचार करा मगच घ्या !!

(तळटीप : याचा संबंध अर्थार्थी १९ तारखेच्या निकालांशी लावू नये , चुकून लावलात , तर पुढच्या फटाक्याचे वर्णन लवकरच वाचायला मिळेल याची ग्यारंटी !! )


केदार उर्फ केडी (२२/१०/२०१४ )

Saturday, 4 October 2014

फक्त “पी” म्हणा !!


खूप मागे एकदा एक किस्सा वाचला होता ....

अमेरिकेत एक कंपनीने त्यांच्या जाहिरातीत महिलांच्या अंतर्वस्त्रावर अमेरिकेच्या झेंड्याचे चित्र / रंगसंगती प्रिंट करून त्या मादक मॉडेल्स चे फोटो टाकले !! अपेक्षेप्रमाणे लगेचच त्या कंपनीविरुद्ध कोर्टात केसेस वगैरे दाखल झाल्या राष्ट्रीय चिन्हाचा , अस्मितेचा , झेंड्याचा अपमान वगैरे आशयाच्या !! यावर कोर्टाने फार सुरेख टिप्पणी केली ..

“अमेरीकेची अस्मिता , मान , अभिमान इतका क्षुल्लक नाही की जो अशा कारणांमुळे कमी होईल , आणि तो जर अश्या कारणांमुळे कमी होत असेल तर आपण त्याला जवाबदार आहोत !! आपण आपल्या देशाला अश्या पातळीवर न्यायला कमी पडलोय की जिथे अश्या गोष्टीनी राष्ट्रध्वजाची अस्मिता , मान कमी होणार नाही !!”

हम्म .... आता हे सगळं वाचून झाल्यावर खालील विडंबन वाचा . ( हे विडंबन नाही कारण अश्या मास्टरपिसेस च विडंबन होउच शकत नाही, पण मला या शब्दा खेरीज इतर कोणता शब्द सध्या सुचला नाही ... त्यासाठी तुम्ही मला करंटा समजा हव तर ... )

त्यानंतर ही तुम्हाला फार वाईट वाटलं या विडंबनाबद्दल , तर चूक माझी नाही तुमची आहे .... तुम्हाला कुसुमाग्रज कळले नाहीत असं समजा अन तोंड समोर करून कामाला लागा . (वाचा : माझ्या नादी लागू नका !!)

ओळखलत का सर मला , गुत्त्यात आला कोणी ,
हातावरती खर्चटलेले , अंगावरती पाणी !!

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून ,
अर्धी बाटली उरली होती , गेली मोरीत वाहून !!

नको नको म्हणता सटवीने मोरीत ओतली ,
मोकळ्या हाती ठेवले नाही , सिक्स्टी मात्र वाचली !!

मटकी खाल्ली चिल्ली खाल्ली , होते नव्हते खाल्ले ,
नशा म्हणून ओठांवरती पाणी थोडे ठेवले !!

रीती बाटली संगे घेउन बार आता शोधतो आहे ,
जुनी देणी फेडतो आहे , उधार नवा शोधतो आहे !!

बाटलीकडे हात जाताच हसत हसत उठला ,
पेग नकोत शेट जरा एकटेपणा वाटला !!

मोडून पडला पेग ,पण संपला नाही चकणा ,
ओठांकडे अंगठा दाखवून , फक्त “पी” म्हणा ...
फक्त “पी” म्हणा !!


-    कुसुमाग्रज-ज केडी !!

Sunday, 16 March 2014

तू ... माझी तू !!


तुला पाहिलं की खूप वेळा मला प्रश्न पडतात, मनात खूप विचार येतात

कोणाचे डोळे जास्त निरागस ?
त्या कथेमधील हरणाचे ? का प्रश्न विचारताना निरागसपणे पाहणाऱ्या तुझे ?
त्या डोळ्यांत जणू सगळं जग सामावलेलं असतं ...खोल ... गूढ ... अर्थगर्भी ...
पण हे असूनही नितळ निरागस असलेलं.... अगदी तुझ्या डोळ्यांसारखं  !!

तुझं नाSSSजूक चाफेकळी नाक ...
त्याचा लाजेने म्हणा रागाने म्हणा ....गुलाबीसर झालेला तो शेंडा ...
पटकन प्रेमाने त्याची पापी घ्यावी असा ...
आणि तू रागावतेस ....तेव्हा थरथरणाऱ्या त्या नाजूक नाकाच्या मी कित्ती प्रेमात पडलोय म्हणून सांगू ...!!

तुझे ते धनुष्यासारखे आखीव रेखीव ओठ ...कायम माझ्या काळजाचा ठाव घेत आलेत ...
तू काही बोलली नाहीस तरीही ...आणि बोलली तरीही ....
तुझ्या ओठांची मनमोहक अदा ..किती किती घाव करतात मनावर ..
तुला नाही कल्पना यायची त्याची ..!!

तुझ्या मऊ केसांचही काहीसं तसंच आहे ...
उन्हाळ्याच्या दिवसात रस्त्याने एकटं चालत जात असतांना,
अचानक झाडाच्या सावलीचा थंडावा अलगद स्पर्शून जावा ...तशीच काहीशी जादू तुझ्या केसांची ....
दिवसभर थकून भागून मी घरी यावा ... आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पडावं ...
आणि तश्यातच.... तुझ्या केसांचा मंद सुवास मनाला स्पर्शून , असंख्य चेतना जागवीत जावा ..
तो मंद सुवास ... मलमली मऊ केसांचा स्पर्श एक वेगळीच शांतता देतो  !!

तुझी ती नाजूक मनगटं ....
कधी कधी तुला छेडताना मलाच भीती वाटते ...पारीजातकाचं फुल जस वाऱ्याच्या स्पर्शानेच कोमेजून जातं ...
तसं माझ्या धसमुसळेपणामुळे तुला त्रास तर होणार नाही ना ??

तुझी बोटं केसातून जेव्हा फिरवतेस ...
तेव्हा जगातली सग्ग्गळी संकटं,चिंता,दु:ख ...अचानक नाहीशी झालीये असं वाटतं ...!!

तुझ्या बोटांची जादूच तशी आहे ...कमळाच्या नाजूक देठासाराखी तुझी बोटं ...
तुझी ती सदफुलीलासुद्धा हेवा वाटेल ...अशी नाजूक नाजूक गुलाबी नखं ...
सगळंच वेड लावणारं ...!!

तुझी गोरीपान मान ..आणि त्यावर रुळणारं तुझं मंगळसूत्र ...
“तू माझी आहेस ... हो “माझीच” आहेस ..” ..
ही भावनाच मनाला किती सुखावून जाते म्हणून सांगू ...
पण कधी कधी मला त्या मंगळसूत्रातल्या मण्यांचा रागसुद्धा येतो बरं का ..
माझ्यापेक्षा जास्त वेळ तेच तुला बिलगून असतात ...!!

तुझी गोरीपान पावलं ...नितळ तळवे ...
जोडवी घातलेली तुझी नाजूक नाजूक बोटं ...
मला खूप आवडलंय तुझं हे नाजूक पावलांनी ...माझ्या आयुष्यात येणं ...!!

तुझ न ... तुझं सगळंच खूप छान असतं ...
खूप सुरेख ...
खूप सुंदर ...
खूप निरागस ..
आणि तरीही खूप अर्थगर्भी ..
तुझ लाजून हसणं ...
तुझं लाजून बोलणं  ...
लाडावणं ..
रागावण ..
पदराशी खेळणं ..
वेडावणं ...
चालणं ..
बोलणं ...
बघणं ,,
तुझं डोळे मिटून गुणगुणणं ...
तुझं शांत झोपणं ...
तू झोपलेली असताना तुझं हळू हळू श्वास घेणं ...
बघSSSत राहावंस वाटतं सगळं ... !!


सग्गळच खूप आवडतं मला ...सगळं ...सगळं ... !!

हो , अशीच आहेस तू ...माझ्या आठवणीतली ...
माझ्या आठवणींच्या कप्प्यात मी असंच जपलंय तुला !!

मला पडलेल्या या सुंदर स्वप्नाच्या शेवटी शेवटी सुद्धा तुझ्या पाणीदार डोळ्यात मला कायम मीच दिसत आलोय !!.

एखाद्या फुलाचा सुवास सगळ्यांसाठीच असतो पण सडा मात्र फक्त झाडाभोवती ...
तसंच तुझ आयुष्य तु जगलीस सगळ्यांसाठी, पण अलगदपणे ते पाखरून मात्र माझ्याभोवती गेलीस ...

फूल झाडापासून वेगळं झालं की त्याचा सुवास विरून जातो , पण त्याच कधीतरी असणं हे कोणीच कधी विसरत नाही !!

अजूनही फोटोमधून पटकन बाहेर येऊन माझ्या गळ्यात पडशील , लाजशील याची वाट पाहतो मी ... 

तुझ्या फोटो समोर बसून तुला मी रोज हेच सांगत आलोय ... 
होय ..”तू ... माझी तू .... माझीच तू” ... !!


तुझाच .................... !!

Monday, 28 October 2013

चषक जिवनाचा !!

कोण म्हणतो चषक माझा ओतप्रोत नाही ?
मापुनी आयुष्य जगणे, माझ्याने होत नाही ..

असेलही अर्धा भरलेला , पूर्ण वा रिकामा ,
धावणे अंधापरी माझ्याने होत नाही ...

बोललो नाही जरी, दो शब्द प्रेमाने ,
कोरडे आहोत ऐसा अर्थ होत नाही ..

कोण कोणाचे इथे ? व्यापार हा जगाचा ,
बेगडी प्रेमास विकणे, माझ्याने होत नाही ...

कर्जे चुकवीत फिरतो, येथे जन्म घेतल्याची ,
व्याज-बाकी गणित करणे, माझ्याने होत नाही ...

भीतीपोटी मूर्ख धावती , दगडांच्या मागे ,
दगडांमाजी श्याम शोधणे, माझ्याने होत नाही ..

चषकामध्ये पूर्ण बुडालो , नशा जिवनाची ,
अर्धामुर्धा डाव सोडणे , माझ्याने होत नाही ...
मापुनी आयुष्य जगणे , माझ्याने होत नाही ....


केदार २८/१०/२०१३ ०१.३०.(पहाटे)