"तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे ? राजसा निजलास का रे ?? "
आणखी एक अनाथ प्रहर ... आणखी एक पोरका दिवस, आणि उद्याच्या येणाऱ्या दिवसाला गर्भात घेऊन निजलेली आणखी एक गर्भार रात्र !!........
================================
मी अजून ही तसाच तिच्याकडे पाठ करून पडलो आहे. हो , पडलो आहे .... कारण झोपेची सलगी आजकाल तशी कमीच अनुभवायला मिळते. क्लांत झालेलं शरीर जेव्हा अगदीच मान टाकतं तेव्हा कधीतरी पापणी लवते.
खरंच, एकीकडे खिडकी बाहेर असलेली निरागस शांतता आणि आमच्या घरात असलेली शांतता यात खूप फरक वाटतो मला. एक पूर्ण साज-श्रुगाराचं लेणं लेऊन सलज्ज अधरांची आहे आणि दुसरी ओवळ्या स्त्री सारखी साश्रू नयनांनी दूर जाणारी सुखाची वाट बघणारी.
या दोघींच्या मध्ये मी पडलोय ... बोडक्या शांततेकडे पाठ फिरवून, एका कुशीवर. पण मला माहिती आहे ... त्या बोडक्या शांततेला माझ्याशी खूप बोलायचं आहे. अर्थात ही कल्पनाही आहे की ती स्वत:हून माझ्याशी बोलणार नाही.
खरय ... आपण दुखाकडे पाठ फिरवून चालत राहतो आणि आपल्या मनाची खोटी समजूत घालून घेतो की दु:ख नाहीये. पण तसं नसतं, ते तिथेच असतं .. आपल्या पाठी. फक्त ते या बोडक्या शांतते सारखं मूक संवाद साधायचा प्रयत्न करत नाही. कधीतरी ते अवचित येतं आणि त्याच त्याचं घेणं घेऊन जातं. पण शांतता तशीsssssssssssssच कायम राहते.
स्वयपाक घरात बहुदा ती आवरत असेल. गाणी ऐकत काम करायची आमच्या दोघांची खरं तर खूप जुनी सवय. पण असं असूनही आमच्या तारा कधी जुळल्याच नाहीत. अनवट रागासारखं आमचं झालंय. गायला अवघड आणि रमायला त्याहून अवघड.
======================================
गाणं ऐकू येतंय ..... तरुण आहे रात्र अजुनी ..... एवढ्यातच त्या कुशीवर , राजसा वळलास का ? रे .... तरुण आहे
============================================
ती आलीये. तीच्या कपड्यांची सळसळच सांगते तिचं येणं.
या सळसळी वरून मला आमचे प्रेमात पडण्या आधीचे दिवस आठवतात. आम्ही बरेच वेळेस बागेतल्या बाकावर भेटायचो. मला आठवतंय, वाऱ्यामुळे झाडांच्या पानांची सळसळ झाली की घाबरून, ती मला घट्ट मिठी मारायची. त्या सळसळीच्या खात्यावर माझे खूप उधार बाकी आहेत.
पण आता ती जीवनाचा उन्मेष जागवणारी सळसळ कुठेतरी वाऱ्यासोबत निघून जात असल्याचा भास होतो. आता सोबतीला राहते ती पायदळी चुरडल्या जाणाऱ्या पानांची आर्त हाक .... सळसळीच्या रूपातली.
===============================================
आशाबाईंचा आवाज हृदयात घर करतोय .....
“सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास कारे ?
==============================================
मनातला आक्रोश वाढत जात असताना हळूच तिच्या मंद गंधाची जाणीव सगळ्या शीणवट्यावर फुंकर घालून जाते.
बहुदा मी ठेवलेला गुलाब तिने पाहिला असावा .... हुंदके ऐकू येतायत . पण माझी सांत्वन करण्याची ताकद संपलेली आहे. शरीराइतक्याच भावना ही गलितगात्र झाल्यासारख्या झाल्यात.
खिडकी बाहेरून चंद्र आमच्याकडे पहात असावा असं वाटतंय. आमचा...आमच्या दोघांचा चंद्रही असाच पौर्णिमेच्या चंद्रासारखा पूर्ण कलेत होता. आता तोच चंद्र खिडकीच्या जाळीतून फुटून हजारो तुकड्यांनी आमच्या अंगावर पडतोय, जणू त्याची नाराजी व्यक्त करत असल्यासारखा त्याची किरणे तो आम्हाला टोचतोय.
त्याचे काही तुकडे माझ्या मुठीतून सटकण्याचा प्रयत्न करतायत आणि काही तिच्या अश्रूंमध्ये विरघळण्याचा
===================================================
हे आकाशवाणी चं मुंबई केंद्र आहे, रात्रीचे १०.३० वाजलेत आणि आपण आता ऐकत आहात
“ लग जा गले के फिर ये हसीन रात हो न हो , शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो ... लग जा गले !!”
2 comments:
Mast.....
Apratim re !!
waah!
Post a Comment