आज अचानक केयूर चा फोन आला मला. तसं पाहिलं तर हा माणूस काही कोणाला
कामाव्यतिरिक्त फोन करत नाही. म्हणजे त्याचेच स्वत:च असं नाही. कोणतंही काम.
त्यामुळे जरा आश्चर्यानेच मी फोन उचलला. म्हंटलं “ काय रे साल्या आज इतक्या
दिवसांनी आठवण आली होय मित्राची ?” त्यावर शांत आवाजात त्याची मर्यादित
प्रतिक्रिया आणि “मला जरा तुझा वेळ हवाय , कधी भेटू शकतोस ? “ हा थंड आवाजातला
प्रश्न, मनात चर्र झालं. कारण फोनची सुरुवात एखाद्या कचकचीत शिवीने , हा त्याचा
शिरस्ता आज कधी नव्हे तो त्यानेच मोडीत काढला होता.
मी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे पांचाली ला पोचलो . केयूर आधीच पोचलेला होता. मी
त्याला हात दाखवला , परत तीच मर्यादित प्रतिक्रिया. मी टेबलावर पोचलो आणि बसतो
तितक्यात केयूर ने एक प्रश्न पुढ्यात टाकला , “ प्रणेश , एक सांग , आपण बांधत
असलेला पत्त्याचा बंगला पडतोय ... पडणारच आहे . हे कळत असून सुद्धा वाऱ्याला
थोपवून धरण्याच्या प्रयत्नाला तू काय म्हणशील रे ? मूर्खपणा ? का ईगो ?.” या
प्रश्नातच मला आजच्या संध्याकाळचं वेगळेपण जाणवायला लागलेलं होतं.
“अरे पण माणसाने पत्त्यांचा बंगला बांधायच्या भानगडीत पडावच कशाला ? तो कधीतरी
पडणारच , मुळात पत्त्यांचा बंगला बांधायला घेणं हाच मूर्खपणा आहे .” मी.
केयूर टिपिकल त्याच्या पद्धतीने तिरकस हसला. “मित्रा , विटांची ऊब
प्रत्येकाच्या भाग्यात असेलच असं नाही. म्हणून मग पत्त्यांच्या चौकडीत आपलं घर
किंवा बंगला बांधायचा प्रयत्न करतात काही वेडी माणसं ..... माझ्यासारखी.”
“प्रत्येक पत्त्याचा स्वभाव निराळा . इस्पिक स्वताच्याच सौंदर्यात हरवलेला ,
बदाम सगळ्यांना हवा हवासा , चौकट चार भिंतीत हरवलेला , आणि किलवर, बिचारा इस्पिक
आणि बदामासारखं दिसण्याच्या नादात वेगळाच घडलेला. पण या सगळ्यात एक राहून जातो
मागे ... ज्याच्या नशिबात पत्त्याचा बंगलाही नसतो .... कोरा पत्ता ... स्वत:च
अस्तित्व हरून पत्त्याच्या बंगल्याचं का होईना.... स्वप्न पाहणारा ....
माझ्याचसारखा !!”
मी नि:शब्द. गेले वर्षभर केयूर आणि निरालीचं फार काही नीट चाललं नव्हतं , याची
जाणीव असून सुद्धा मी विषय काढायचा म्हणून विचारलं , “ बाकी सगळं ठीक आहे न ? ,
बरेच दिवसात तुम्हा दोघांची भेट नाही !!”
“आम्ही दोघंही मजेत आहोत , अडचण फक्त इतकी आहे We are living together , while our hearts are living apart. आणि हे सगळं कळत असून मान्य करायची हिम्मत नाहीये दोघांची ,
कारण डोहाचा न पाहिलेला तीर फार भेसूर आणि भयानक आहे मित्रा.”
“आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही दोन वेगळ्या platform वर उभे आहोत आणि गाडी
मात्र एकच धरायचा प्रयत्न करतोय.”
कधी कधी केयूर असच अगम्य बोलतो. या जगापासून दूर नेणारं. आणि हे बोलतांना
त्याच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता असते , पण डोळ्यातले भाव याच्याशी बंड करतात
आणि नजरेमधलं कारुण्य हळूच घसरून ओठावरील निरर्थक हास्याच्या कोंदणात विराजमान
होतं, आणि खोटं खोटं सुखाचं चित्र दाखवायचा प्रयत्न करतं.
“अरे पण मग तुम्हाला हे कळतंय तर तुम्ही समजुतीने मिटवत का नाही हे सगळं ?
दोघही समजुतीने संसार कराल .” ... मी.
“समजुतीने ? अरे भांडण होत असलं तर समजुतीने मिटवणार न ? आणि आमची शरीरं सोबत
राहतायत , मनं कधीच खिडकीतल्या पाखरांसारखी दूर उडून गेलीत सुखांच्या शोधात. कधी
कधी आशेने येतात बिचारी खिडकीत परत, पण हाती काहीच येत नाही म्हंटल्यावर बापडी
हिरमुसून निघून जातात परत.”
माझ्या मनात कुठेतरी दुरून आवाज येत होता , “शरीरं सोबत असल्याने होतो तो फक्त
सहवास , त्याला मनाची जोड मिळाल्यावर होतो तो संसार !!”
केयूर आणि निराली .... दोन पाखरं .... घरटं बांधण्यासाठी धडपड करणारी .... एक
पाखरू बुलबुल सारखं उच्छृंखल आणि एक गरुडासारखं ... ताकदवान पण स्वताच्या उंच
आकाशात उडणारं. मनातून जाणीव होती कि यांची आकाशं एकरूप होणं अवघड आहे .... पण
कुठेतरी मनाला हे मान्य नव्हतं... आणि म्हणून खरी पाखरं सोडून, या दोघांचं एकाच
पिंजर्या मधलं चित्र मी मनाच्या भिंतीवर लाऊन टाकलं .
मी केयूरच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणालो , “ अरे होत असतं असं . काळजी नको
करू , होईल सगळं नीट .” तो काहीच बोलला नाही . तो कधीच काही बोलत नाही. घराची सगळी
दारं घट्ट बंद करून बसलेल्या मुलासारखा.
No comments:
Post a Comment