पंढरी ... रोजसारखाच आजही त्याला घरी जायला तसा उशीरच झाला होता. बरोबरच होतं
म्हणा, आजकाल सुट्ट्या चालू असल्यामुळे लोकांची ये जा वाढलेली असणं अपेक्षितच
होतं. त्यात याची ड्युटी कोकण पट्ट्यावर , म्हणजे पाहायलाच नको. थकून जायचा बिचारा
, पण तो थकवा फार काळ काही टिकायचा नाही , सुट्टीवर ... मामाच्या गावी जाणारी लहान
लहान मुलं , त्यांचा तो उत्साह ... थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. अन त्यात आज
गजर्याचा दिवस होता, उद्या सुट्टी म्हणजे आज मजा करायला मोकळा होता तो.
आजची ड्युटी संपली होती, आता रोकड आणि उरलेली तिकिटं परत केली की चंद्री कडे जायला
हा मोकळा.
* * * * * * *
“काय मावशे ?? चंद्री कुठाय ?? तिला सांग पंढरी आलाय म्हणा
बसायला ... अन ज्यादा वेळ थांबणारे आज ...
काय ते दाम घेऊन टाक आधीच ... नंतर दिष्टर्ब नाय पायजे !!” ... पंढरी
“या पंढरी शेट ... होती कुठं स्वारी म्हणायची ?? या वक्तास
ज्यादा उशीर केलात यायाला . अन आज माफ करा शेट ... पण यमने संगत बसा आज ... चंद्री
नाईये २-३ आठवडे झाले !! फोन केला त फोन पण घेईना गेली .. माजलीये जणू !! लोकानले निस्ता पैसा हवा ... मोहन पण रांडेचा
गिर्हाईक देईना आजकाल !!”
* * * * * * *
चंद्री बिगर आजची रात्र नेहमी प्रमाणे नव्हती ... पंढरी लवकर घरी निघाला !! कोपर्यावरून
थोडी खारी आणि भेळभत्ता घेतला. पुढे जाऊन मोहन वाट पाहत असेल अस मनात येते न येते
तोच त्याची हाक पडलीच कानावर.
मोहन ... मावशेच्या मागच्या गल्लीतला गजरेवाला !! गजर्यातून पैसा कमीच ...
गजरे कुस्करणार्या कडूनच काय ती पैश्याची उलाढाल !!
पण आज फुलांत ती टवटवी नव्हती, कोमेजून गेलेली वाटत होती बिचारी , आणि त्याचा
... “मोहनचा” चेहरा पण तसाच होता ... कोमेजलेला !!
“काय शेठ ? आज फारशी गिऱ्हाईकी झालेली दिसत नाई ? तोंड का
पाडून बसलायत ? का ड्राय डे मुळे धंदा चालेनासा झालाय ?” ... पंढरी.
“नाई हो ... धंदा न चालाय काय झालय ? बायको ला बर नाय म्हणून
विचार करीत बसलोय ... का पैसा कुठन आणायचा ?”
“अरे बाबा .. पण धंद्यात लक्ष नाय दिलं तर कसं चालल ??
चंद्री कडून माग कि पैसा. नायतर मावशे शी बोलू का मी ? दील तुला ती. तू इतकं
गिर्हाईक आणून देतो चंद्री साठी ... वरून गजर्याच्या धंद्यातला प्राफीट पण देतोयस
.. काय कमी केलं का तू मावशे साठी ? “ ... पंढरी.
“नाय हो ... मावशे देव माणूस हाय ... पण मीच लाजतोय मागायला
... काय तोंड दावायच मावशे ला ? “ ... मोहन.
“काय तोंड दाखवायचं म्हणजे ? आरे रोजचं १० गिर्हाईक देतोयस
मावशे ला ... मग ?? काय हक हाय का नाय ?” पंढरी .
“जाउद्या पंढरीशेट ... जावा तुम्ही तुमाला नाय कळायचं ... मी बघतो काय करायचं ते !!”
* * * * * * *
“अरे पंढरी .... तुला कितीवेळा सांगितल ? उकिरडे फुंकायला
जाऊ नकोस ... घरी सोन्यासारखी बायको आहे. तर नाही .. तुम्हाला अय्याशीतून फुरसत
नाही. भोग आता आपल्या कर्माची फळं . फार दिवसाचे नाहीत पाहुणे आपण !! “ ... डॉक्टर हिंगमिरे जरा चिडूनच बोलत होते. “हा आणखी एक संसार ... सुरु होण्या आधीच संपलेला “ ... ते मनात म्हणाले .
“पार्वती येऊन गेली परवा ... म्हणत होती की ती वांझोटी आहे
म्हणून घरी जायला नकार देतोस. अरे पण हि जी मर्दानगी गाजवलीयेस ... त्याचं काय
करायचं आता ?? आणलस न रस्त्यावर फुलासारख्या बायकोला ? बिचारी अजूनही लहान बाळासाठी डोळे कोरडे करतेय
... तुला काय त्याच ? “
* * * * * * *
“मीराताई काय सांगू ?? आम्ही गरीब माणसं ... औषधाला पैसा नाय
... त्यात देवाने असं खेळ केलाय बगा . ५ वरस घातल. पण मुल होईना बगा. आता दत्तक
घ्यायचं तर कोण देईना झालं या गरिबाला. बायको बगा रित्या कुशीला धरून रड्तीया.
म्हून मग निर्णय घेतला... का हा उपाय करायचा ... जीवाला आधार अन मनाला समाधान तर
लागल अशी येडी अशा होती बघा ताई . कूस भरली कि आम्ही दोघबी सगळं सोडून गावाला
जाणार होतो बगा. पण काय झालं बगा. आता एकट्याने काय करावं जगुन ? अन कोणाला तोंड
दाखवावं ? डाक्तर म्हणतय की उशीर झालाय ... २-५ म्हयन्याचाच खेळ आये .
सोन्यासारख्या बायको ला येड्या आशेला लावून जीव घेतला बागा जिवंतपनी तिचा. आर सात
जलम बी वांझोट राहन चालतंय .. पण अशी जीवाला जीव देनारी बायको गावायची नाय कुठं !!
”
* * * * * * *
"“नाय हो ... मावशे देव माणूस हाय ... पण मीच लाजतोय मागायला ... काय तोंड दावायच मावशे ला ? “ …… "जाउद्या पंढरीशेट ... जावा तुम्ही तुमाला नाय कळायचं ... मी बघतो काय करायचं ते !!”
“अरे पंढरी .... तुला कितीवेळा सांगितल ? उकिरडे फुंकायला जाऊ नकोस"…
सगळे चेहरे आणि संवाद काल घडल्यासारखे पंढरीच्या डोळ्यासमोर तरळून जात होते .
अचानक त्याची तंद्री भंग झाली .... समोर एक विदारक सत्य आणि एक भोळी आशा एकाच
वेळेस जळत होती. तो आणि मोहन स्मशानात उभे होते . सगळा खेळ संपला होता .... अचानक
काल खूप मोठं वाटणार आयुष्य प्रत्येक सेकांदागणिक कमी होतंय हि बोच खूप जीवघेणी
होती.
आणि अचानक त्याच्या कानावर मोहनची एक आर्त हाक पडली .....
” “चंद्रेssssssss ..... मला सोडून जाऊ नकोस ....कूस नाय भरली तरी चालल पण अशी जीनगी
रिती करून नको जाउस ” ...
आता चितेवर एक शरीर ... चंद्री .... एक आत्मा.... पंढरी , आणि दोन मनं ... मोहन आणि पार्वती ... जळत होती !! मागे
राहिली होती ती २ स्वप्न ... भरल्या "ओटी" ची !!
4 comments:
शेवटी 'ओटी' आणि 'कूस' रिकामीच राहिली….
छान जमलंय … पण मध्येच हे इतकं वेगळं लिहिण???
'सगळेच ' रिकामे राहिले . पण पार्वती साठी जास्त वाईट वाटले .
लिहिलेस छान आणि वेगळेच .
छान आहे. अख्खी कादंबरीच लिहू शकशील. कथेतील पात्रांची नावे अतिशय चपलख निवडलीस.
कथन उत्कृष्ट केले आहे. शेवटी सर्व संदर्भ जुळल्यावर एक धक्का जाणवतो. सुंदर !!
अभिनंदन आणि धन्यवाद !!
Post a Comment